Saturday, December 18, 2021

नातीच लग्न

 

इस्पितळ फार नामांकित नव्हतं.  म्हणजे वैद्य सेवाभावी होते त्यांच्या हाताला गुण होता.  पण ‘पॉश’ वातावरण नसल्यामुळे या आयुर्वेद इस्पितळात भरती होण्यासाठी तसे फार रुग्ण येत नसावेत.  बाहेर वैद्यांच्या आउटपेशंट डिपार्टमेंट मध्ये -दवाखान्यात-   मात्र भरपूर गर्दी दिसत होती. 

मी गेलो तेव्हा सकाळी दहाची वेळ असावी.  जनरल वॉर्डात दहा-बारा खाटा होत्या.  दोन-तीन खाटांवर रुग्ण होते. एक छोटा मुलगा, एक मध्यमवयीन कृश महिला, आणि कोपऱ्यात एक आजी, एवढेच रुग्ण होते. समोरच्या दारातून डाव्या बाजूला परिचारिका, सेविका यांची छोटी खोली दिसत होती. त्यात दोघी टेबलाभोवती बसून गप्पा मारत बसल्या होत्या. गप्पा रंगल्या होत्या.  मी त्यांच्याकडे अप्पांची  चौकशी केली. तेव्हा त्यांनी समोर कुठे तरी बसून घ्या असं सुचविलं .   तेव्हा ते वैद्यांकडे गेले होते आणि त्यांना यायला अर्धा एक तास सहज लागणार होता हे लक्षांत आलं. त्याची रिकामी खाट मला एकीने दाखवली.  एक  स्टूल सरकवून वाट पाहत बसलो. 

अप्पांना भेटून त्यांची ख्याली-खुशाली विचारणे आवश्यक होतं. लागेल ती मदत द्यायची होती.  त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे अनंत उपकार होते आमच्या घरावर. तात्पुरती बदली होऊन ते येथे आले होते आणि त्यांचा दम्याचा विकार बळावला बळावला होता. मीच त्यांना या वैद्यांचे नाव सुचवलं होतं.  आणि ते दोन तीन दिवसापूर्वी इस्पितळात दाखल झाले होते.  

आता त्यांची वाट पाहण्याखेरीज पर्याय नव्हता.  स्टुलावर अवघडून  बसत इस्पितळात निरीक्षण  करत बसलो. त्या वेळेस दुसरं काही करण्यासारखं काही नव्हतंच.  जुनाट लोखंडी खाटा त्यावर कळकट पांढऱ्या चादरीने झाकलेल्या गाद्या, शेजारी औषध ठेवण्यासाठी,  कपाट  फळ ठेवण्यासाठी अशी कपाटं, मच्छरदाणी टाकण्यासाठी लावलेले, वाकून बाक आलेले गज,  इस्पितळाच्या आवारात कुठेतरी भट्टीवर उकळत असलेल्या काढ्याचे आणि कुटत असलेल्या चूर्णाचे  कडवट तुरट वास यापेक्षा आणखी निरीक्षण काय करणार! दोनच मिनिटात माझं निरीक्षण संपलं सुद्धा.  ती मध्यमवयीन  कृश  महिला सर्व आवरून नुकतीच अंगावर चादर घेऊन पडली होती.
काय आजार असेल हिला? सुखवस्तू घरची सून असावी. 

कुठल्यातरी असाध्य रोगावर इतरत्र इलाज होत नसल्यामुळे आयुर्वेदाच्या इस्पितळाचा आसरा बहुदा घेतला असावा.  म्हणजे, हा आपला रिकामटेकड्या माणसाचा माझा अंदाज. माझ्या मनाशी आरोग्याचे  निदान देखील निश्चित करून टाकलं. चार-पाच रोगांची नावे पण ठरवली.  

छोटा मुलगा सरळ सरळ मुडदूस चा रोगी वाटत होता.  आठ वर्षाचा असावा. शांत निपचित पडला होता. मधूनच डोळे उघडून वार्डात भिरभिर नजर फिरवीत होता. एकदा दोनदा आमची नजरानजर झाली सुद्धा. एकदा मनात आलं की  उठून त्याच्याशी गप्पा माराव्या.  आसपास आम्ही दोघेच पुरुष होतो. गप्पा मारायला अडचण नव्हती. इतर बायांशी काय बोलणार! एकदा त्या स्टुला वरून उठून त्याला भेटायचा प्रयत्न केला  देखील. पण त्या बाळाने डोळे मिटले.  भिंतीकडे तोंड करून परत झोपायला लागला. 

आजी आपल्या कॉटवर उशीवर रेलून, डोकं भिंतीवर टेकून पडल्या होत्या.  मी आलो तेव्हा मोसंबी की चिकू त्या खात होत्या. त्यांनी मला पाहिलं नव्हतं बहुतेक.  कारण मी त्यांच्याकरकडे पाहिलं तसं लगेच छानसर हसून त्यांनी विचारलं, “ कुलकर्णी  ना?” मी मान डोलावली.  तसं त्यांनी सांगून टाकलं, “वैद्य येतीलच जरा वेळात,” मी “बरं” म्हटलं.  वाटलं, त्या चांगल्या सत्तरीच्या असतील. होत्या गोऱ्यापान, तरतरीत नाक आणि तेजस्वी डोळे. तरुण असताना त्या खूप देखण्या असतील, हे नक्की.  आता चेहऱ्यावर अन हातावर सुरकुत्याचं  जाळं विणायला सुरुवात झाली होती. आवाजात मार्दव होतं आणि अधिकार वाणीदेखील. आयुष्यभर सुखात गेल्यामुळे - निदान बराच काळ  - त्यांनी आनंदात काढला  असावा.  कपाळावर कुंकू बरीच वर्षे लावलेलं नसावं.  नाव काय असेल त्यांचं? लक्ष्मी आजी, की  सरला आजी? आणि आडनाव? लेले, आपटे की गाडगीळ? 

नकळत मी उठून त्याच्याशी  बोलायला सुरुवात केली आणि ‘आजी काय होतंय’ असं थोडं औपचारिकपणे  विचारलं देखील. 
“मला काय होतंय कप्पाळ! काही नाही होत बघ.  उद्या सकाळी मी जाईन घरी. ” 

त्या मोकळेपणाने सांगू लागल्या.  मी खाटेवर त्यांच्या पायाशी अलगत टेकून बसलो. “माझा मुलगा आणि सून बाई आहेत ना फार घाबरट आहेत.  बघ, थोडा सर्दी खोकला झाला तर लगेच इथे आणले त्यांनी. 

“ अरे वा! पण बरं झालं ना.  वेळीच उपचार तरी झाले.”


“  ते ही खरंच म्हणा,” आजी म्हणाल्या. 

 “आता बघ मी उद्या गेले की नाती च्या लग्नाची तयारी करते. 

आजी आता खुलून बोलत होत्या. “ छान, छान.  लग्न आहे का तुमच्याकडे?

“ म्हणजे काय! मी सांगितलं नाही  तुला ?

“थांब. तोंड गोड कर” म्हणत आजी चटकन उठल्या.  कपाटापाशी जाऊन त्यांनी पेढ्याचा बॉक्स काढला, आणि एक घसघशीत पेढा माझ्या हातावर ठेवला. 

मला उगीचच बरं वाटलं.  आजीला तिच्या लग्नात मिरवायला मिळणार म्हणून आजी सांगत होत्या.  त्यांची सोनल कशी गोड पोर आहे नक्षत्रा सारखी देखणी आणि गुणवान आहे.  हुशार आहे.  नुकतीच इंजिनियर झाली आहे. तिला  डॉक्टर मिळाला जोडीदार  अगदी लक्ष्मीनारायणा सारखा दिसतो आणि … असं काय काय सांगत होत्या. उत्साह ओसंडून जात होता. घरी कधी परत जाईन असं त्यांना झालं होतं. सगळी तयारी करायची घाई झाली होती त्यांना.  

तसं पाहिलं तर तपशीलात मला काहीच स्वारस्य नव्हतं.  माझ्या मेंदूत  काय शिरत  आहे याकडे त्यांचं लक्ष नव्हतं.  त्या आणखी बोलत राहिल्या असत्या  तर इतकं त्यांचं बोलणं लोभस वाटत होतं मला. मी ऐकत राहिलो असतो पण त्याच म्हणाल्या मला.  आले तुझे आप्पा...मग आमच्या गप्पा थांबल्या.  मी अप्पाना घेऊन बाहेर पडलो.  

आप्पा कष्टी झालेले दिसत होते.  बोलायचे थांबले म्हणून मीच त्यांना थांबायला सांगितलं.  मीही इस्पितळातून खाली स्कूटर जवळ आलो.  तेव्हा बहुधा सोनाल चे आई वडील कार पार्क मध्ये आले. त्यांच्याजवळ आणखी एक पेढ्याचा बॉक्स दिसला. आईकडे छापून आलेल्या पत्रिका असाव्यात असे ही मला वाटले तेव्हा. पण थांबलो नाही.  उशीर झाला होता. 

अप्पांच्या कॉट कडे गेलो. प्रकृती बरी दिसत होती. ते हसले. बस म्हणाले हळू आवाजात आम्ही बोलू लागलो. अर्धा पाऊण तास बोलत बसलो त्यांना काय हवं नको विचारलं . त्यांच्या घरी काय कळवायचं ते विचारून घेतलं .. निघालो आणि दोन दिवसांनी परत येतो म्हणालो. 

जाताना न कळत पुनः आजी कडे गेलो. उगीचच गमतीने म्हणालो” आजी, यायचं  का आम्ही सोनलच्या लग्नाला?” 

म्हणजे काय?! नक्की ये मी पत्रिका देऊन ठेवते. अप्पांकडे. आज आणणार आहे सुनबाई. अप्पानाही घेऊन जा. तोवर ते नक्की बरे होतील. ‘

मी निघालो . वेळ झाला होता घाईघाईने स्कुटर पाशी आलो. ते आपल्या कार मधून उतरत होते. बहुधा सोनल चे आई वडील असणार. 

मला गम्मत वाटली. सोनलला मी अद्याप पाहिले देखील नाही. नि  तिच्या आई वडिलांना  ओळख असल्या सारखे दाखवत होतो. आजींच्या चेहऱ्या सारखा वाटत होता सोनलच्या बाबाचा चेहरा. तसाच वर्ण .. तिच्या आईच्या हातात पिशवी होती. त्यात खाली फळं असावीत आजींसाठी .वर परत पेढ्याचा मोठा बॉक्स. 

मी घाईत होतो. ऑफिस ला उशीर होत होता. वेळ असता तर दोन शब्द बोललोही असतो त्या दाम्पत्याशी. 

दोन दिवसांनी यायचे ठरवले होते. आलो नाही. अचानक दौऱ्यावर जावे लागले. अप्पांच्या घरचे सगळेच आमच्या कडे आले. काकू, त्यांचा  मुलगा, मुलगी. आमच्या घरीच थांबले. पंधरा दिवसांनी मी परत येईपर्यंत अप्पा इस्पितळातून घरी आले आणि रजा घेऊन घरी साताऱ्याला निघून गेले होते. 

आजी आणि सोनल हे सगळं मी विसरून गेलो. नेहेमीच्या रामरगाड्यात गुंतून  गेलो. दोन महिन्यांनी अप्पा परत घरी आले तोपर्यंत. रात्री जेवणं झाल्यावर अचानक आठवलं आजी बद्दल. अप्पा क्षणभर स्तब्ध झाले. जणू घरच्या कुणा म्हाताऱ्या आजी विषयी बोलताहेत. 

अण्णांनी मलाच उलटा प्रश्न केला.“तुलाही त्या आजींनी पेढा दिला होता का?” मी “हो” म्हटलं. 

“नातीच लग्न ठरलं होतं त्याच  आजीनं ना? तुम्हाला नाही का त्यांनी दिला?”

“मलाच काय, सगळ्यांना त्या पेढा देत होत्या. त्याच दिवशी नाही तर रोज. हॉस्पिटल मध्ये येणाऱ्या प्रत्येकाला गेले वर्षभर देत होत्या.  आग्रह करून पेढा देत होत्या. नातीच लग्न ठरलं आहे असं सांगत.”

‘म्हणजे?’

“तुला त्यांनी सांगितलं ना सोनल इंजिनियर झाली.  नात जावई डॉक्टर आहे,  आणि दोघांचा जोडा लक्ष्मीनारायण सारखा शोभतो म्हणून”

“हो.  आणखी बरंच काही सांगत होत्या पण काय झालं होतं नेमकं” आप्पा कष्टी झालेले दिसत होते. बोलायचे थांबले म्हणून मीच सांगितलं. “मी हॉस्पिटल मधून खाली स्कुटर जवळ आलो तेव्हा बहुदा सोनल चे आई वडील कार मध्ये आले. त्यांच्याजवळ आणखी एक पेढ्याचा बॉक्स दिसला आईकडे.  छापून आलेल्या पत्रिका असाव्यात असं वाटलं मला. ”

“अरे कुठलं काय! कसलं लग्न आणि कसल्या पत्रिका! सगळाच प्रकार अतर्क्य विश्वास बसेल तुला की सोनल या जगातच नाही? ती वर्ष सव्वा वर्षापूर्वी दिवाळीत देवाघरी गेली होती.” आप्पाने निश्वास घेत  सांगून टाकलं.  अवाक मी झालो. 

स्वयंपाकघरातील झाकपाक करून ही सुद्धा शेजारी येऊन बसली होती अप्पा सांगत होते. आजींच्याच मुलाने आणि आईने म्हणजे सोनलच्या आई बाबांनी सांगितलेली हकीकत. आजी देवाघरी गेल्या होत्या. अप्पा अप्पा सातारतला आपल्या गावी परतले त्याच्या दोनच दिवस आधी. 

वर्षांपूर्वी सोनल सगळ्यांना सोडून देवाघरी गेली होती. आजी सागत तशी सोनल खरंच गोड चुणचुणीत मुलगी होती. खूप उशार  होती. इंजिनियर होणार होती. दोनच महिने राहिले होते परीक्षेला. आणि पोरीला दृष्ट लागली. तिच्या स्कूटर ला भरधाव कारने उडवलं आणि क्षणभरात रस्त्यावर रक्ताचा मासाचा सडा झाला. 

एकुलती एक मुलगी गेली. आई-बाबा वेडेपिसे झाले. शेजारी पाजारी, नातेवाईक, मित्र मैत्रिणी सर्व दुःखा:ने हळहळले. आजींची लाडकी नातं. आजोबासारखीच इंजिनियर होणार होती म्हणून आजीला केव्हड  कौतुक!. त्या सांगायच्या आजोबा देवाघरी गेले ते नातीला आशीर्वाद देऊन मोठी इंजिनियर होण्याचा. 

अशी आजी . सोनल जेवल्या खेरीज ना जेवणारी. ती  झोपल्याखेरीज न झोपणारी. घरभर आकांत चालू असताना त्यांचाही आक्रोश जीव पिळवटून टाकणारा. तिरमिरीत त्या उठल्या आणि देवासंबोर जाऊन त्याला जाब विचारू लागल्या. उर बडवत त्याला बोल लावू लागल्या आणि तेथेच कोसळल्या. कोणाच्या तरी लक्षात आलं आणि आजीना जवळच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले. त्या शुद्दीवर आल्या तेव्हा सोनल जाऊन पंधरा दिवस झाले होते.  आई बाबा जगायचं म्हणून दिवस काढत होते. आजींकडे देखील लक्ष देणं आवश्यक होते. 

आजींशी सोनल विषयी कोणी बोलत नव्हतं. त्या हिंडत्या फिरत्या झाल्या तेव्हा त्यांनीच नातीची चौकशी सुरु केली. “झाली का सोनलची परीक्षा?”  आवंढा गिळत आईबाबांनी “हो” म्हटलं . 

आणखी काही दिवस गेले. आता आजींना तिच्या लग्नाची घाई झाली होती. “माझे डोळे मिटण्यापूर्वी तिचे हात पिवळे करा,” असा आग्रह सुरू झाला. 

आजींना वेड लागलं होतं. 

आपल्या नाती वर जीवापाड प्रेम करणाऱ्या आजीचं हे असं व्हावं हा आणखी एक आघात होता आई बाबांवर. 

दुसरा आजार नाही, फक्त एकच वेड.  नातीचे लग्न डॉक्टरशी व्हावं.  आल्या गेल्या प्रत्येकाशी फक्त एवढच बोलणं. 

हॉस्पिटलच्या प्रमुखांनी सांगितलं म्हणून आजींना घरी आणलं.  तेव्हा त्यांनी सोनल ची चौकशी केली. कुणीतरी सांगितलं सोनल नोकरीला “गेली आहे. येईल, संध्याकाळी.” 

पण एवढ्यावरही  आजींचं  समाधान झालं.   पण आई बाबांच्या मागे सारखं लग्नाचं टुमणं  सुरू झालं.  दोघांना  सोनल गेल्याचे दुःख होतं.  आता ही आणखीनच वेगळी व्यथा. आजीच्या वेडा ची.  दिवसभर तोच विषय. 

वेड्यांच्या इस्पितळात ठेवावं का? बाबांना कोणी सुचवलं.  पण त्यांनी ते झटकून लावलं.  आईलाही ते पटलं नाही. वैद्यांकडे आजींना  आणलं ते उपचारासाठी.  पण त्यांच्या रुग्णालयात शक्य नसेल तर आजींना काही दिवस ठेवावं अशी कल्पना होती.  वैद्यांनी दाखल करून घेतलं.  आणि आई-बाबांनी ही सोनलचं, लग्न ठरलं आहे.  मुलानं मुलीला पाहिलं. दोघे एकमेकांना पसंत पडली, असं  आजींना  सांगणं त्यांनी चालू ठेवलं. आजी खुश होत होत्या. सुनेकडून पेढ्याचा बॉक्स यायचा. आजी  दिवसभर वाटत राहायच्या असा दिनक्रम चालूच राहिला

अप्पा इतर रुग्ण आणि त्यांना भेटायला येणारे माझ्या सारखे मित्र व नातेवाईक त्यांना पेढा मिळत होता प्रथमच येणाऱ्यांना काही शंका यायची कारणच नव्हतं त्या दिवशी संध्याकाळी सोनल च लग्न होतं.  मुलगा आणि सून येतील मला घ्यायला आज दुपारी येतील असं त्या सांगत राहिल्या. तुळशीचे लग्न झालं की पहिला मुहूर्त जरा धरू  असं त्या सांगत राहिल्या. मुलाने सूनबाईने शब्द पडू दिला नाही.  म्हणून आजी  त्यांचं कौतुक करत होत्या.  बाहेर रस्त्यावर दुरून बँडचा आवाज येऊ लागला.  आजी तरातरा खिडकीपाशी गेल्या. बाहेर डोकावून पाहिलं आणि आनंदाच्या भरात सगळ्यांना बोलवलं.  या 

नातीला, नात जावयाला भेटायला. त्या स्वतः तयार होऊन  बसल्या, आपल्याला वरात घरी पोहोचायच्या आत जायचं म्हणून.  परिचारिकांची तारांबळ उडाली. त्यांनी गोडीगुलाबीने आजींना कॉटपर्यंत आणलं. आजींना उत्साहाचं आनंदाचं उधाण आलं होतं  जणू.

थकवा आला तरी त्या बोलत होत्या. डोळ्यावर झापड आली होती.  डोळे मिटायच्या पुन्हा ग्लानी येऊन पडायच्या.  बऱ्याच वेळाने वॉर्ड  शांत झाला. तेव्हा अप्पांच्या  लक्षात आलं की आजींच्या कॉटवर हालचाल नाही.  अशुभ शंका आली म्हणून ते जवळ गेले. आजींच्या कपाळावर हात ठेवला.  ते गार पडले होते. 

वैद्य आले. त्यांनी नाडी पाहून सांगितलं, सारं काही आटोपलं आहे.  वॉर्ड मध्ये निशब्द शांतता पसरली.  आजी गेल्या होत्या.  सोनल चं  लग्न झालं या आनंदात.  उशीजवळ पेढ्याचा बॉक्स होता चेहऱ्यावर समाधानाचं हसू होतं. 

प्रा डॉ किरण ठाकूर 

०३, इंद्रायणी, पत्रकारनगर,

drkiranthakur@gmail.com 


(शब्द १७०५)


नातीच लग्न

  इस्पितळ फार नामांकित नव्हतं.  म्हणजे वैद्य सेवाभावी होते त्यांच्या हाताला गुण होता.  पण ‘पॉश’ वातावरण नसल्यामुळे या आयुर्वेद इस्पितळात भरत...